प्रमोद डफळ
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
राहुरी विद्यापीठ, दि. 22 ऑगस्ट, 2025 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळे सांघिक भावना जोपासली जाते, ध्येय गाठण्याची इच्छा जागृत होते आणि जीवनात शिस्त निर्माण होते. यामुळे स्पर्धेत हारजीत महत्त्वाची नसून सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भनगे केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये पदव्युत्तर महाविद्यालयांतर्गत आंतरमहाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धा-2025 संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सुनील भनगे बोलत होते. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी (पम) डॉ. विजय पाटील, फुले कृषी वाहिनीचे प्रमुख डॉ. आनंद चवई, प्रसारण केंद्रप्रमुख डॉ. सचिन सदाफळ, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, क्रीडा अधिकारी (पम) डॉ. बाबासाहेब भिंगारदे, सहाय्यक कुलसचिव (पम) गोविंद तागडे, कृषी महाविद्यालय, पुणेचे क्रीडा अधिकारी डॉ. अभिजीत नलावडे, श्री. भाऊसाहेब बेल्हेकर, श्री. दत्तात्रय कदम, डॉ. सुरज गडाख व श्री.अभिजीत धनवडे उपस्थित होते. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस कृषी महाविद्यालय, पाणीव, जि. सोलापूर, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कृषी महाविद्यालय, पुणे तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कृषी महाविद्यालय, विळद, जि. अहिल्यानगर या संघास मिळाले. मुलींच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कृषी महाविद्यालय, बारामती या संघास मिळाले. या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धेत विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील 40 कृषी महाविद्यालयातील मुलांचे 35 संघ तर मुलींचे 29 संघ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विविध संघाचे संघ व्यवस्थापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.


