शिवाजी पवळ
शहर प्रतिनिधी श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यात पुन्हा एकदा अवैध गुटखा विक्रीचा मुद्दा गंभीर बनला आहे. उच्च न्यायालयाने व राज्य सरकारने गुटखा विक्रीवर कडक बंदी घातली असतानाही, तालुक्यातील अनेक भागांत गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गावागावात किराणा दुकानांच्या नावाखाली गुटखा, पानमसाला यांची खुलेआम विक्री केली जाते. विशेष म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील सहजपणे हा घातक पदार्थ उपलब्ध होतो. या अवैध व्यापारामुळे तरुण पिढी आरोग्याच्या गंभीर समस्यांकडे ढकलली जात असल्याची चिंता पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी राज्याने अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांना विशेष जबाबदारी दिली आहे. परंतु श्रीगोंदा तालुक्यात या यंत्रणांकडून फारशी हालचाल दिसून येत नाही. उलट ठिकठिकाणी गुटखा पुरवठादार व विक्रेत्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे.गुटखा सेवनामुळे कर्करोगासह तोंडाच्या विविध आजारांचा धोका वाढतो. आरोग्याबाबत जनजागृती कमी असल्याने तरुण गुटखा व पानमसाल्याच्या आहारी जात आहेत.अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही?युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या विक्रीकडे प्रशासन डोळेझाक का करत आहे?नागरिकांच्या तक्रारी असूनही कारवाई का नाही?श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थ व सामाजिक संघटनांनी प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून हा अवैध धंदा आटोक्यात आणावा, अशी मागणी करत आहे.








