रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव : पीक कर्ज सरकारी योजनांचे अनुदान व पीक विमा मिळण्यासाठी सातबारावर पीक नोंद बंधनकारक आहे. मात्र सर्वर डाऊन मुळे ई- पिक पाहणी अॅपवर पिकांची नोंद होत नाही. सतत प्रयत्न करूनही नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्याची पायपीट सुरू असुन तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहे. सततच्या’सर्वर डाऊन’ च्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ई- पीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून शासनाच्या पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणते पीक घेतले आहे, याची अचूक माहिती ई-पीक पाहणी प्रणालीव्दारे शासनाकडे नोंदविणे आवश्यक आहे. मोबाइल अॅपमधील पाहणीमध्ये नोंदी केलेल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची गरज भासत नाही. शेतकऱ्यांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतः पीक पाहणी करावी. यासंदर्भात कोणती अडचण आल्यास गावात नियुक्त करण्यात आलेल्या तलाठी, कृषी सहायकांच्या मदतीने नोंदी पूर्ण कराव्यात, असे आवाहनही महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, मोबाइल अॅपवर ई-पीक नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नोंदणी करताना ओटीपी वेळोवेळी मागितला जातो. प्रत्येकवेळी वेगवेगळा ओटीपी येत असल्याने पुढे जाता येत नाही. दरम्यान, मध्येच सर्व्हर डाऊन झाल्यास सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागते. याशिवाय या अॅपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करताना कमी एमबीचे लागतात.
(बाॅकस)
प्रत्यक्षत शेतकऱ्यांनी मोबाइलवर शेतात फोटो काढल्यास तो जास्त एमबीचा येतो. त्यामुळे तो अपलोड होत नाही. परिणामी पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागत आहे. तसेच शेतात उभे राहुन ही लोकेशन दुर अंतरावर दाखवत आहे यामुळे शेतकरी प्रचंड वैतागले आहेत. अशी प्रतिक्रिया प्रतीक पाटील नरवाडे यांनी व्यक्त केली आहे











