संजय लांबे
तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी
ब्रम्हपुरी : वर्तमानातील शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता महाविद्यालयातील तरुणांनी त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता भारतीय संविधानाचा सखोल अभ्यास करणे महत्वाचे आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकष वर्तमान आणि भविष्याचा वेध घेऊन राष्ट्रीय एकात्मता व अखंडता अबाधित राखण्याची जबाबदारी तरुणांवर सोपवलेली आहे. त्यामुळे संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, समाजवाद, व धर्मनिरपेक्ष या लोकशाही मानवी मुल्यांवर आधारित मानवतावादी समाजव्यवस्था निर्माण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन ने. हि. महाविद्यालयातील इंग्रजीचे प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे आयोजित “भारतीय राज्यघटनेचे सार” या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. युवराज मेश्राम, प्र. विभागप्रमुख प्रा. जयंत बोरकर आणि अधिव्याख्याता डॉ. नितीन पोटे उपस्थित होते. डॉ. युवराज मेश्राम भारतीय संविधानातील साराचे महत्व विशद करतांना पुढे म्हणाले कि, भारतीय राज्यघटना देशातील सर्व नागरिकांना सन्मान आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देते. प्रजासत्ताक नागरिक हा भारतातच नव्हे जगात कुठेही आदरणीय ठरतो. संविधानातील मानवी मुल्यांची जोपासना करणारा भारतीय नागरिक हा निखळ मनुष्यत्वावरील मानवतावादी आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतो. मानवतावादी समाज घडविणे हा भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे तरुण विद्यार्थ्यांनी स्वत:ला वाचनाचा व्यासंग लावून भारतीय राज्यघटनेतील हक्क, कायदेशीर अधिकार आणि स्वकर्तव्यांची जाणीव करून घटनात्मक मुल्यानुरूप स्वत:ला घडविणेही गरजेचे आहे. विद्यार्थीनी कु. गायत्री चतारे आणि कु. दिया सुखदेवे यांनी आपले अभिप्राय व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार डॉ. नितीन पोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संघर्ष पिल्लेवान आणि श्री. प्रवीण चाचीरे यांनी प्रयत्न केले. व्याख्यानाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.











