कैलास शेंडे
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदूरबार:तळोदा-तालुक्यातील खरवड येथील अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या आवारातून अपहरण झाल्याचा पालकांकडून मंगळवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तीन दिवस पूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह शुक्रवार रोजी संध्याकाळी छिन्न विच्छिन्न व मृत अवस्थेत केळीच्या बागेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान अवघ्या बारा तासात पोलीसांनी आपली चक्रे फिरवत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, खरवड येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या पालकांनी मंगळवार रोजी तळोदा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. जिल्हा परिषद शाळेसमोरून सातवीच्या वर्गात शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी मंगळवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी गाव व नातवाईकांकडे चौकशी केली असता ती मिळून आली नव्हती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, गुरुवारी रोजी मोड शिवारातील सुभाष छगन नवले यांच्या केळीच्या शेतात मजूर निंदणी करत असताना बेपत्ता झालेली तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आला. सदर घटना गावात वाऱ्या सारखी पसरली. मुलीचा मृतदेह आपत्तीजनक अवस्थेत आढळून आल्यामुळे घातपाताचा व अनुचित प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रावण दत्त, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी रात्रभर जागरण करीत आरोपीचा इतरत्र शोध घेतला. दरम्यान गुप्त माहितीवरून पोलीसांनी आरोपी मनिष सतीश नाईक वय 22 रा. लाखापूर येथील एका गोठ्यातून पकडले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला एका अज्ञात स्थळी ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान तालुक्यातील संतप्त नागरिकांनी पोलिस स्टेशन तळोदा येथे मोठया प्रमाणात गर्दी केली होती. जमाव इतका प्रचंड संतप्त होता की, आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आरोपीला फाशी द्या अशा संतप्त घोषणा जमावाकडून देण्यात येत होत्या. त्यामुळे घटनेचे गांभीर्य व जमावाचा रोष बघता पोलिस विभागाने आरोपीला गोपनीय स्थळी रवाना केले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हळुहळू जमाव कमी झाला. आरोपीला पकडण्यात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पो.उपनिरीक्षक महेश निकम, धर्मेंद्र पवार, मुकेश पवार ई. पोलिस अधिकारी व एल.सी.बी कर्मचारी यांच्या संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड करीत आहे.