गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी,भुसावळ
भुसावळ : सातपुडा शिक्षण संस्था संचालित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद येथे विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर झालेल्या समारंभात क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धाचे आयोजन चालू आहे. यामध्ये कृषी महाविद्यालय, नागपूर येथे पार पडलेल्या फेन्सिंग (तलवारबाजी) या क्रीडा प्रकारामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.गौरी बुदुकले हिने द्वितीय पारितोषिक पटकावले होते. तसेच विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल, वाशिम येथे करण्यात आले होते. त्यामध्ये सुद्धा उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. मागील वर्षी सुद्धा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठ संघामध्ये तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खो-खो या क्रीडा प्रकारासाठी निवड झाली होती. यामध्ये चार मुले व एक मुलगी यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव इंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.हरिभाऊ इंगळे, सचिव डॉ.शेषराव भोपळे, कोषाध्यक्षा डॉ.स्वातीताई वाकेकर, संचालक मा.रामदास वाकेकर, कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे व अन्य संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पदक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. प्रशिक्षक, पालक आणि महाविद्यालयाचा पाठिंबा यामुळेच ही उंच भरारी शक्य झाली आहे, असे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.कृष्णराव इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, क्रीडा हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा मार्ग नसून तो शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी साधन आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात केलेली कामगिरी संपूर्ण संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. ही यशस्वी कामगिरी त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा, शिस्तीचा आणि चिकाटीचा परिणाम आहे.











