गजानन ढोणे,
ग्रामीण प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा : जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेकडो कुटुंब बेघर झाले. काही गावांचा संपर्क तुटला तर काही गावांना पाण्याने विळखा घातला. या पूरग्रस्त लोकांसाठी बुलढाणा लाईव्ह ने मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला. धान्य, कपडे, किराणा, शैक्षणिक साहित्य, इत्यादी सामानाची पहिली खेप 28 आणि 29 जुलैला वाटप करण्यात आली. दुसरी खेप 4 ऑगस्ट रोजी पूरग्रस्त बांधवांसाठी पोहोचवण्यात आली असून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या बुलढाणा “जिल्हा सारथी परिवार” या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतनिधी जमा करण्यात आला. त्यातून जीवनावश्यक किराणा साहित्याची खरेदी करून ती मदत बुलढाणा लाईव्ह कडे सुपूर्द करण्यात आली.जिथे जिथे गरज असेल तिथे सारथी ग्रुप मदतीसाठी सदैव तयारच असतो. असेच एप्रिल महिन्यामध्ये नांद्रे दांडा फाट्यावर झालेल्या अपघातात कुमारी भक्ती मस्के गंभीर जखमी झाली होती. तिच्या उपचारासाठी देखील सारथी ग्रुपने मदत निधी जमा केला होता आणि आता जळगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी सुद्धा सारथी ग्रुपने मदत निधी जमा करून त्यातून किराणा साहित्याची खरेदी करून ती मदत बुलढाणा लाईव्ह टीम कडे सुपूर्द केली आहे. सारथी ग्रुपचे समाधान पाटील, सादिक शहा, असिफ शहा यावेळी उपस्थित होते.