बबनराव धायतोंडे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर : दि-१ ऑगस्ट इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीची रिंग (संरक्षण कठड्याचे) काम सुरु असताना त्यातील पूर्वेकडील भाग कोसळून त्या खाली काम करणारे चार मजूर गाडले गेल्याची दुर्दैवी घटना घडली. गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी एन डी आर एफ पथक दाखल झालेले आहेत एन डी आर एफ पथकाकडून मुरमाखाली अडकलेल्या मजुरांचा शोध चालू आहे.याबाबत सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार म्हसोबाची वाडी येथील विजय क्षीरसागर यांच्या मालकीच्या जमीन गट नं ३३८ मध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या विहिरीची रिंग ( संरक्षक कठडा) चे बांधकाम सुरु असताना सदर प्रकार घडलेला आहे. रिंगचे काम करणारे कामगार रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता काम करत असलेल्या सदरच्या विहिरीमध्ये संरक्षण कटडा तुटून त्यावरती मुरमाचा ढिग असलेला प्रकार उघडकीस आला. काम करणारे मजूर याच कठड्याखाली दबल्याची चर्चा सुरू झाली आणि मजुरांची शोध मोहीम सुरु झाली.घटनास्थळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट देत प्रशासनाला शोध कार्यासाठी सूचना करत घटनास्थळी तळ ठोकला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती बारामती विभाग पुणे ग्रामीण, श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर हे हजर असून घटनास्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.