रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत खरीप हंगामासाठी सर्व समावेशक पीक विमा योजना राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या वर्षापासून शेतकरी हिस्स्याची विमा रक्कम राज्य शासना मार्फत भरण्यात येणार असून शेतकऱ्यांनी केवळ रु 1/- भरून पोर्टलवर विमा नोंदणी करावी. पिक विमा उतरवण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या सरकार सेवा केंद्र, सेतू, CSC, बँक, ऑनलाईन सेंटर इत्यादी मार्फत पिक विमा काढावा. योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांना 7/12, आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत व पिक पेऱ्याबाबत स्व यंघोषणापत्र सादर करावे लागेल.चालू हंगामाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या दिनांक 26 जुन 2023 च्या शासन निर्णय अन्वये यावर्षी
महालनोबीस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर, दिल्ली या संस्थेमार्फत सुदूर संवेदन (Remote Sensing) व अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील प्रत्यक्ष पिकाच्या पेऱ्याची खात्री केली जाणार आहे. यावर्षी तेल्हारा तालुक्यात मूग व उडीद पिकाचा प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांमार्फत विमा उतरवण्यात आलेला आहे. योजनेच्या शासन निर्णय अन्वये अतिरिक्त संरक्षित विमा क्षेत्राचा शेतकऱ्याचा विमा हप्ता जप्त केल्या जाणार आहे. तसेच पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्र यामध्ये तफावत आढळून आल्यास अश्या शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्दबातल केले जाणार आहेत. त्यामुळे तालुक्या तील सर्व शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात पेरलेल्या पिकाचाच विमा काढावा असे आवाहन गौरव राऊत , तालुका कृषि अधिकारी, तेल्हारा यांनी केलेले आहे. चुकीच्या पिकाचा विमाकाढल्यामुळे विमा प्रस्ताव रद्दबातल झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असणार आहे.ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पिकाचा विमा उतरवला असेल अश्या शेतकऱ्यांनी दिनांक 26 जुलै 2023 पर्यंत पूर्वी ज्या आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, CSC, बँक, ऑनलाईन सेंटर इत्यादी कडून विमा काढला असेल त्यांच्या मार्फतच पिक बदल करण्याबाबतचा लेखी विनंती अर्ज केल्यास, अश्या नवीन पिकाचा विमा त्यांना काढणे शक्य होईल.