संजय भोसले
तालुका प्रतिनिधी कणकवली
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग म्हणून करूळघाट ओळखला जातो. पण सध्या गेली काही दिवस जोरदार पावसाचा तडाका संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. तसेच पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणचे डोंगर खचत आहेत तर काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यात करूळ घाट तरी अलिप्त कसा राहू शकेल ? अतिवृष्टीचा फटका यालाही बसला. शुक्रवारी पावसाचा काहीसा जोर कमी झाला होता परंतु शनिवारपासून पुन्हा जोर वाढला असून दिवसभर पावसाने अगदी हैराण करून सोडले होते. सह्याद्रीच्या परिसरामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे करुळ घाटात गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर दरड कोसळून भला मोठा दगड रस्त्यावर आला होता. दगड रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे वाहतूक काही काळ कोळंबडी होती. तर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात घाट रस्ता असल्याने दुसरी कडून वाहतूकही करता येत नव्हती. वैभववाडी पोलिसांना दगड रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच पोलीस हवालदार राहुल पवार व रमेश नारणवर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. आणि ताबडतोब जेसीबी बोलावून रस्त्याच्या मधोमध असलेला दगड बाजूला करून वाहतूक पूर्वत सुरू केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून जिल्ह्यातील नदी, नाले सततच्या पावसामुळे तुडूंब भरून वाहत आहेत. तर अनेक छोटे मोठे काॅजवे आणि मोर्या सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार ही करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.


