रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : वेदांत शास्त्र मान्यतेनुसार प्रतिभाषिक , व्यवहारिक आणि परमार्थिक अशा तीन प्रकारच्या सत्ता मानल्या जातात . प्रतिभाषिक हे स्वप्न सृष्टी असून, व्यावहारिक सत्तेत मात्र जीव आणि जगत तर परमार्थिक सत्तेत ” एक मेवाद् द्वितीयं ब्रह्म “अर्थात केवळ ब्रह्मच असते.स्वप्नात लागलेल्या तहानेला झोपण्यायापूर्वी डोक्याजवळ भरून ठेवलेल्या गडव्यातील पाण्याचा उपयोग होत नाही . तसेच प्रत्यक्षातील तहानेला स्वप्नातील तलावाच्या पाण्याचा उपयोग होत नाही . अर्थातच एका सत्तेतील वस्तू दुसऱ्या सत्तेत जशास तशी उपयोगाला येत नाही .त्याकरिता त्या वस्तूला सत्तांतरच करावे लागते आणि म्हणूनच पारमार्थिक सत्तेतील ब्रह्माचा व्यावहारिक सत्तेतील जीवाला उपयोग होण्याकरिता त्या ब्रह्माला सत्तांतर केल्याशिवाय गत्यंतर नाही . म्हणून सत्तांतरीत होऊन या अवनीतलावर अवतीर्ण झालेलं प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजेच संत होत असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.ते आज आदिशक्ती मुक्ताई संस्थान मेहून तापी तीर या ठिकाणी आषाढ वैद्य एकादशी वारी निमित्त आयोजित किर्तन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की वारकरी संप्रदायातील प्रत्येक संत हा अवतारी असून तो दीन , दुराचारी व विषयासक्त आदिकरून उद्धारपरान्मुख जीवांच्या उद्धाराकरताच या अवनीतलावर अवतरीत होत असतो . संपूर्ण जगतामध्ये आपला उद्धार करून घेणारे ऋषीमुनी , आपल्यांचा उद्धार करणारा देव तर ; अखिल मानव मात्रांचा उद्धार करणारे केवळ संतच असतात .ऋषीमुनींनी केवळ आत्मोध्दार साधून ते गिरीकंदरांमध्ये गेले , देवमात्र भक्तांचा उद्धार करीत असतांना दृष्टांचा नायनाट करतो परंतु संत हे दृष्टांना सृष्टच नव्हे तर श्रेष्ठ बनविण्याचे महत्कार्य करीत असतात . असे अनेक पौराणिक ऐति हासिक तथा अर्वाचीन उदाहरणे देऊन महाराज यांनी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या आईसाहेब मुक्ताई यांच्या भक्तांच्या समोर उपरोक्त विषयाचे प्रतिपादन करून मुक्ताईच्या अवतार कार्यासंबंधी महती विशद करून सांगितली.सदरहू कार्यक्रमाचे आयोजन संस्थांचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत रामरावजी महाराज मेहुणकर , सर्वश्री शारंगधर जी महाराज मेहुणकर गजानन महाराज बाठे , संभाजी महाराज गाढे , हरिभाऊ महाराज म्हसाये आदिकरून महाराज मंडळींनी केले असल्याचे श्री सुधाकर महाराज मेहुणकर हे कळवितात .


