फिरोज सय्यद
तालुका प्रतिनिधी जामखेड
जामखेड : जामखेड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांच्यावर सिनेस्टाईलने विना परवाना पिस्टल गोळीबार करण्याची घटना घडली असून पोलीस निरीक्षक यांनी स्वतः व सोबतच्या कर्मचाऱ्यांच्या स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. यानुसार मुख्य आरोपीसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना दि. १८ जुलै रोजी रात्री १२ : १० वाजताचे सुमारास घडली असून आज सकाळी ती वाऱ्यासारखी पसरली. यामुळे मोठी खळबळ उडाली असून जामखेड शहरात गुन्हेगारीने किती डोके वर काढले आहे हे दिसून येत असून अशी गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करताना दिसून येत आहे. तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मोठे धाडस करून गुन्हेगारांविरूध्द उचलेले पाऊल व स्वतःसह सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे केलेले संरक्षण याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणारे अदनान जहर शेख यांच्या मालकीची व त्यांच्या आईच्या नावावर असलेली ईर्टीगा गाडी क्रमांक MH 12 KT 4795 हि घेवुन उभे असताना आरोपी प्रताप ऊर्फ बाळा पवार, रा. सारोळा व त्याचे सोबत असलेले दोन अनोळखी इसम असे तिघेजण मोटारसायकल वरून आले. व प्रताप पवार याने त्याचे कमरेला असलेले पिस्तुल काढून अदनान जहर शेख यांच्या डोक्याला लावले व बळजबरीने माझ्या ईर्टीगा गाडीत ड्रायव्हर सिटवर बसुन प्रताव पवार याने जबरदस्तीने ईर्टीगा गाडी कोठेतरी नेली आहे. तसेच त्याचे सोबत असलेले दोघे अनोळखी इसम यांनी मला “आमचे नादी लागला तर तुला खल्लास करून टाकू अशी धमकी दिलेली आहे. ते दोघेजण त्यांचे मोटार सायकल वरून ईर्टीगा गाडीच्या पाठीमागे गेले. ही घटना घडत असताना नाईट पेट्रोलिंग करत असताना गाडी मालक अदनान जहर शेख व सहकारी प्रज्वल पालवे दोघे यांनी पोलीस निरीक्षक श्री. महेश पाटील यांना सदर घटनेची माहिती दिली. यावरून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने आपले सहकारी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष नामदेव कोपनर, अविनाश ढेरे, देविदास पळसे, प्रकाश मांडगे, गणेश भागडे व कुलदिप घोळवे यांना सोबत घेतले व सदर ईर्टीगा गाडीमध्ये जीपीएस सिस्टीन असल्याने त्या नुसार गाडीचे लोकेशन सारोळा रोडवरील मंगेश आजबे यांचे तालिमी जवळ दिसत होते. त्यानुसार दोन पोलीस गाड्यांमधून पथक त्या ठिकाणी पोहचले. व आरोपीचा शोध घेत असताना जामखेड खर्डा असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार हा त्याचे दोन साथीदारांसह त्याठिकाणी आढळून आला.आपल्याला पकडण्यासाठी आलेले पाहून आरोपी प्रताप उर्फ बाळा हनुमंत पवार ह्याने त्याच्या कमरेला असलेले पिस्टल बाहेर काढुन त्याचे हातातील पिस्टल पोलीसांच्या दिशेने रोखुन पिस्टलचे ट्रिगर दाबुन पोलीसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी “तुझ्या हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा.” असे आवाहन करुन देखील गोळीबार करण्याच्या उद्देशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न करून पोलीसांशी झटापट करत असताना आरोपी पोलीसांवर गोळीबार करण्याची शक्यता वाटल्याने पोलीस निरीक्षक महेश पाटील स्वतः व सोबत असलेले पोलीस कर्मचारी या सर्वांचे स्वसंरक्षनार्थ आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने गोळी झाडली ही गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झाला. यावेळी आरोंपीनी पोलीसांशी केलेल्या झटापटीत व मारहाणीत काही कर्मचारी किरकोळ जखमीही झाले आहे. तर प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार,( वय ३०) यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यावरून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष नामदेव कोपनर, (वय ३५) वर्षे, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, (वय ३०) शुभम बाळासाहेब पवार, (वय २१) काकासाहेब उत्तम डुबे (वय २१) सर्व रा. सारोळा ता. जामखेड जि. अहमदनगर यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. तर गोळीबारातील जखमी आरोपीला अहमदनगर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.या घटनेने एकच खळबळ उडाली असुन गुन्हेगारीने किती डोके वर काढले आहे याचा अंदाज येत आहे. गुन्हेगार जर पोलीसांवरच गोळीबार व हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत अश्या गुन्हेगारांचा कायम बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
चौकट
जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत कोणतीही गुन्हेगारी किंवा गुन्हेगार यांना थारा दिला जाणार नसून सर्व प्रकारची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. मात्र जनतेने अश्या गुन्हेगारांविरूध्द तक्रार देण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी पुढे आले पाहिजे.