गजानन ढोणे
ग्रामीण प्रतिनिधी, बुलढाणा
बुलढाणा : गँगरेप म्हणून राज्यभर गाजलेल्या राजूर घाटातील विवाहितेवरील अत्याचाराचे प्रकरण ‘छेडखानी’ आणि ‘लूटमारी’चा प्रकार निघाला आहे. पिडीतेने स्वतः येवून तिच्यासोबत कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगितल्यानंतर सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान हायप्रोफाईल झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींपैकी 7 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. उर्वरीत एक आरोपी अजून फरार आहे. पीडीतेसोबत असलेल्या 35 वर्षीय व्यक्तीने बोराखेडी पोलिसात तक्रार दाखल केली मात्र महिलेने वैद्यकीय तपासणीच्या वेळी माझ्यावर कोणताही अत्याचार झाला नसल्याने वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नसल्याचे लिहून दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या 7 आरोपींपैकी दोन आरोपी विधीसंघर्ष बालक अर्थात 18 वर्षाच्या आत असल्यामुळे त्यांची रवानगी शासकीय बाल निरीक्षक गृहामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पहिला आरोपी राहुल रमेश राठोड वय 25 रा. मोहेगांव, मंगेश मल्हारी मोरे वय 23, काजू रमेश राठोड वय 27 वर्ष रा. मोहेगांव, विजय उर्फ दयन्या मधुकर बरडे वय 19 वर्षे रा. डोंगरखंडाळा, किसन उर्फ श्रीराम बरडे वय 21 रा. डोंगरखंडाळा यांचा समावेश आहे. इतर दोघे 18 वर्षापेक्षा कमी असल्यामुळे त्यांची नावे देता येणार नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार यापैकी राहुल राठोड आणि मंगेश मोरे या आरोपींना फत्तेपुरहुन मोताळ्याकडे येत असतांना डिवाय एस.पी यांच्या पथकाने पकडले तर काजू राठोडला त्याच्या घरूनच पकडण्यात आले आणि इतर चार जण तारापूरच्या जंगलाकडे लपत-छपत जात असतांना पोलिसांना मिळून आले.











