सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी सातारा
सातारा : घाट माथ्यावर पावसाने चांगली सुरुवात केली आहे. डोंगर माथ्यावरील काही धबधबे सुरू झालेले आहेत. हिरवाई डोके वर काढू लागली आहे. त्यामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर पर्यटक फिरायला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी फुलांच्या संवर्धनासाठी तारेच्या जाळीचे कुंपण घालण्यात आले होते. परंतु ते वन्य प्राण्यांना फिरण्यास अटकाव करत होते. त्याचा परिणाम फुलांच्या परागीकरणावर झाल्याने फुलांचा हंगाम कमी होत, असल्याचे निदर्शनास आल्याने, ते तारेचे कुंपण काढण्यात आले. कुंपण काढल्याने फिरायला आलेले पर्यटक कास पठारावर जेथे फुले येतात त्या भागात सैरावैरा फिरू लागली आहेत. म्हणून कास पठार कार्यकारी समिती व उपवन संरक्षण महादेव मोहिते यांच्या उपस्थितीत हंगाम नियोजन झालेल्या बैठकीत तंगुसाचे कुंपण बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे कुंपण दरवर्षी केवळ हंगाम कालावधी पुरते मर्यादित असेल त्यामुळे वन्यप्राणी व फुलांच्या परागीकरणावर याचा परिणाम होणार नाही. यासाठी सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कास पुष्प पठारावर रस्त्याच्या बाजूला साधारणपणे चार ते सहा किलोमीटर लांब व चार मीटर उंच असे तंगुसाच्या जाळीचे कुंपण लवकरच बसवण्यात येणार आहे. अशी माहिती समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी दिली.











