मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यामध्ये खाजगी मोबाईल कंपन्यांनी केबल टाकण्यासाठी मुख्य स्त्यालगत खोदकाम काम चालू केलं आहे.अशा कामांना कोणाचा विरोध नाही परंतु या कामासाठी कंपन्यांच्या ठेकेदारांकडून चक्क दिघी श्रीवर्धन मार्गावरील बोर्लीपंचतन येथील पुलाच्या कठड्याला लागून सुमारे दीड फुटाचं खोदकाम केल्याने भविष्यात या पुलाला धोका उत्पन्न होऊन रहदारीसह ग्रामस्थांना नाहक त्रास करावा लागू शकतो.वास्तविक पाहता या मार्गावरच्या इतर पुलावर खोदकाम न करता पुलाच्या कठड्याला लागून बाहेरुन केबल नेण्यात आली असताना बोर्लीपंचतनमधे मात्र ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता या पुलाचं खोदकाम का करण्यात आलं ?असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.रात्रीच्या वेळी चालू असलेलं काम काही जागृत नागरीकांच्या लक्षात आल्याने त्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत माहीती घेतली असता अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पुलावरील काम बंद ठेवण्यास सांगुन सुध्दा ठेकेदाराने ते काम सकाळी पुर्ण केल्याचं निदर्शनास आलं.पुलाच्या कठड्याला लागुन होत असलेल्या खोदकामाची माहीती समजताच सरपंच ज्योती परकर यांनी पाहणी करुन याबाबत ठेकेदाराला जाब विचारण्यात येईल असं आश्वासन संबधिताना दिलं. याआधीसुद्धा ठेकेदाराकडून बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खोदकामादरम्यान फुटल्याने ऐन होळी सणामध्ये पाणी पुरठ्यावर परीणाम होऊन ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला होता. ठेकेदार खोदकाम करताना संबधीत ग्रामपंचायत व स्थानिकांना विश्वासात न घेता कामं पुर्ण करीत असल्याने सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत आहे.याकडे संबधित विभागाने लक्ष देऊन ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने श्रीवर्धन तालुका प्रचार संयोजक माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत धनावडे यांनी केली आहे.


