मुकेश मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा-६ जुन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओ बी सी समाजाचा सर्वात मोठा शत्रु हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य म्हणजे लबाडपणाचे वक्तव्य असुन या वक्तव्यावरून बावनकुळे हे लबाडाचे सरदार असल्याचा घणाघात माजी आमदार बी आर एस नेते चरण वाघमारे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजाचे मेळावे आयोजित करुन व ओबीसी समाजाची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहे पण सत्तेत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी ओबीसी चा विचार केला नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी चा सर्वात मोठा शत्रु असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दैनिक वृत्तपत्रांच्या माध्यमातून केला आहे. पण हे वक्तव्य करतांना बावनकुळेनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगणे अपेक्षित आहे. भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपच्याच नेत्यांनी भाजपची सत्ता दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थावर स्थापीत होऊ नये म्हणुन चरण वाघमारे यांना अंधारात ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोबत छुपी दोस्ती केली. तुमसर पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत चरण वाघमारेचा समर्थक सभापती बनु नये म्हणून भाजपच्याच एक सदस्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधले ही बाब लक्षात येताच चरण वाघमारेंनी डाव हाणून पाडत भाजपची सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळवले.जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चरण वाघमारेंचा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत बसण्याचा विरोध असतांना सुध्दा बावनकुळे, फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बसण्यासाठी आमिष दाखवन्याचे अनेक अयशस्वी प्रयोग करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध म्हणजे विरोध ही भूमिका चरण वाघमारे यांनी घेतल्याने बावनकुळे फडणवीस तोंडघशी पडल्याने याच बावनकुळेनी कोणताही विचार न करता एकतर्फी निर्णय घेत चरण वाघमारेंवर सहा वर्षकरिता निलंबनाची कार्यवाही केली. याचे मुख्य कारण काय?तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध.त्यामुळे चरण वाघमारे हे देशाच्या इतिहासातील कदाचित एकमेव पहिलेच नेते असतील ज्यांनी विरोधी पक्षासोबत युती करण्यासाठी विरोध केला ज्यामुळे त्यांना निलंबनाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागले.पुन्हा याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे चरण वाघमारे यांना कोणताही राजकिय वारसा नसतांना त्यांचा जिल्ह्यातील वाढता जनाधार पाहता बावनकुळेंना कदापी सहन होणे शक्य नव्हते जेणेकरुन राज्याच्या राजकारणात भंडारा जिल्ह्यातून ओबीसींचा एक तरुण पिढीचा नेता समोर येऊन आपण मागे राहू ही बाब सुध्दा बावनकुळे यांचे पचनी पडणे शक्य नव्हते.ही सुध्दा माहिती चरण वाघमारे यांनी दिली आहे.
राज्याच्या राजकारणातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसी आरक्षण. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना नुकत्याच मागील वर्षीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आल्याने बावनकुळे व फडणवीस यांनी ओबीसीच्या राजकिय आरक्षणासाठी राज्यभर रान माजवून सरकारकडून ओबीसींना आरक्षण मिळवून देणे शक्य होत नसेल तर सरकारने आमच्या चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री संजय कुटे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांना सर्वाधिकार द्या तीन महिन्यात आरक्षण मिळवून देऊ हे फडणवीस यांचे जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असेच वक्तव्य.मात्र फडणवीसांच्या या महत्वपूर्ण भूमिकेनंतर दोन तीन महिन्यांनी महाविकास आघाडी सरकार संपुष्टात येऊन शिंदे फडणवीस सरकारला आज जवळपास दहा ते अकरा महिन्यांचा कालावधी लोटूनही सर्वाधिकार तुमच्याकडे असूनही चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, पंकजा मुंडे कुठे गेलेत? आणी त्यांचा ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला?याचा अजूनही पत्ता नाही.यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची व भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपली व भाजपची भूमिका स्पष्ट करण्याचे सोडुन केवळ विरोधाभास दाखवून राज्यातील जनतेची दिशाभूल करणे म्हणजे लबाडपणाचे धोरण असल्याने नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे नोंदणीकृत लबाडाचे सरदार असल्याचा घणाघात आरोप माजी आमदार बिआरएस नेते चरण वाघमारे यांनी केला आहे.