सय्यद रहीम रजा
उमरखेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरखेड : शहरात गत आठवड्यात माहेश्वरी चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल बसविण्यात आले त्यामुळे वाहतुकीला एक शिस्त लागेल, रस्त्याने अपघात होणार नाही इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित करून बसविण्यात आलेल्या ट्राफिक सिंगल चे जनतेतून स्वागतच होत आहे तर दुसऱ्या बाजूने उमरखेड शहरातील प्रवास करीत असलेल्या रस्ता म्हणजे रस्त्यातून खड्डे की खड्ड्यातून रस्ता अशी अवस्था असून अस्थिपंजर झालेल्या रस्त्याचे आरोग्य सुधारण्याचे काम संबंधित विभागातून कधी करण्यात येईल असा सवाल ज्वलंत जनतेतून निर्माण होत आहे. नागपूर बोरी तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून सदर मार्गावर लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्या अवजड वाहने ही शहरातील मुख्य रस्त्याने जात असतात नाग चौक ते महागाव रोड आणि पुसद ते ढाणकी रोड या रस्त्यावर प्रवास करताना रस्त्यातून खड्डा आहे की खड्ड्यातून रस्ता आहे हे न उमजणारे कोडे असून शहरातील मुख्य ठिकाण म्हणजे माहेश्वरी चौक आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथे असलेले खड्डे हे अतिशय जीवघेणे असून. गत आठवड्यात बसविण्यात आलेल्या ट्राफिक सिग्नल मुळे माहेश्वरी चौकात एकच गर्दी होत आहे याला कारण या रस्त्यात असलेले खड्डेच आहेत असंख्य विद्यार्थी वर्ग जनता यांना या रस्त्याने प्रवास करताना जीव मोठे घेऊन जावे लागते. काही वेळेस नाहीतर बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये व रस्त्याचा असुविधेमुळे विद्यार्थी वाहन चालक पादचारी हे या खड्ड्यांमुळे जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत व पुढे किती घडतील याची कल्पना न केलेली बरी. या रस्त्याचे दुरुस्ती बाबतीत विविध वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे इत्यादी प्रसार माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध होत असतात तरीही संबंधित कार्यालयाचे अधिकारी तसेच जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने निवडून गेलेले नेते मंडळी सुद्धा याबाबतीत उदासीन का आहे? जर ते उदासीन नाहीत तर रस्त्याचे काम का होत नाही? अशा प्रश्नांचा डोंगरच उभा असलेला दिसेल. संबंधित विभागाने उमरखेड शहरातील अस्थिपंजर झालेल्या रस्त्याचे आरोग्य सुधारण्याची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी जनतेतून होत आहे याबाबतीत काय कार्यवाही होते याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.