सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मुर्तिजापुर
मुर्तिजापुर : दिवाळी हा सण तोंडावर आला असतांना अद्याप अनेक रेशन दुकानात मोफतचे धान्य उपलब्ध झाले नाही.तसेच शासनाने जाहीर केलेले १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा ही किट अद्याप पर्यंत शासकीय धान्य गोदामात पोहचली नाही.दिवाळी पूर्वी रेशन दुकानात पुरवठा विभागाने आनंदाचा शिधा ही किट उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी रेशन दुकानदारांसह रेशन कार्डधारकामधून होत आहे. यंदा अतिवृष्टी व संततदार पाऊस कोसळत असल्याने ग्रामीण भागात शेतकरी शेतमजूर आदी आर्थिक अडचणी सापडले आहेत. त्यातच पावसामुळे सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या शेतात उभे असून काहींनी सोंगलेले गंजी लावून शेतात पडून आहे. दिवाळी हा सण अवघ्या ३ दिवसावर येऊन ठेपला असल्याने सण साजरा करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे.दिवाळी साजरी करण्यासाठी जवळ पैसा नसल्याने अल्प दरातील व मोफतचे रेशन व शासनाने जाहीर केलेले १०० रुपयात आनंदाचा शिधा जाहीर केलेले रवा,पामोलिन तेल,साखर,चणाडाळ दिवाळीपूर्वी वाटप होणे गरजेचे आहे. परंतु अद्याप अल्प दरात मिळणारा आनंदाचा शिधा ची किट शासकीय गोडाऊनला उपलब्ध न झाल्यामुळे दिवाळीपूर्वी मिळणार की नाही,यावर अनिश्चितता आहे.











