अकोला : जिल्ह्यातील धोतर्डी गावात अजगराची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मुख्य म्हणजे 8 फूटाच्या या अजगरला ठार मारून रस्त्यावर फेकण्यात आले. मंगळवारी सोशलमाध्यमांवर हे फोटो व्हायरल झाले. यानंतर वनविभागाने घटनेचा चौकशी करून घटनास्थळ गाठले. या प्रकरणी वनविभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला. तसेच अज्ञातांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील धोतर्डी गावात शेत-शिवार सोमवारी ग्रामस्थांना रस्त्यावर तब्बल 8 फुटाचा दिसून आला. हा प्रकार पाहण्यासाठी येथे लोकांनी प्रचंड गर्दी केली. काहिंनी अजगराचे फोटो काढून सोशल माध्यमांवर ठेवले. या संदर्भात फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वन्यप्रेमींकडून अजगरांना मारणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, आज अकोल्याचं वन विभागाचं पथक धोतर्डी गावात दाखल झाले. तसेच पशुवैद्यकीय कार्यालयात शवविच्छेदन केल्यानंतर या अजगरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणात अज्ञात ग्रामस्थांवर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अजगराला नेमके कोणी मारले, याचा वनविभागाकडून शोध सुरु आहे. दरम्यान, तीन ते चार व्यक्तींनी अजगराला मारले असल्याचे समजते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी राजसिंग ओवे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नागरीकांनी आपल्या आसपास वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्यास जवळपास असलेल्या वनविभाग कार्यलयाला कळवावे. माहिती देणारेचे नांव गोपनीय ठेवून, कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. सोशल माध्यमावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती अजगरापुढे उभा आहे. अनेकांनी त्याला आरोपी समजून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, चौकशीमध्ये ही व्यक्ती आरोपी नसल्याचे पुढे आहे. तरी वनअधिकारी याबाबत सखोल चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले.


