अकोला : अकोला शहरात गुजराती नवरात्री महोत्सव समितिच्या वतीने मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे. यावर्षीही गरबा महोत्सवात अकोलकर नागरिकांसाठी गुजरातची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरब्याच्या रूपाने बघावयास मिळणार आहे. अशी माहिती गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली. ते स्थानीय मुंगीलाल विद्यालय प्रांगणात बोलत होते.
गरबा महोत्सवात यावर्षी गुजरातच्या अस्सल लोककलेची पारख असणाऱ्या गुजरातच्या राजकोट येथील प्रख्यात महेश जोशी यांच्या रोहन बिट्सचे संगीत कलाकार हजेरी लावून गुजरातचे हे कलाकार आपल्या संगीतमय आवाजाची जादू या ठिकाणी पारंपरिक गरब्याच्या रूपाने साकार करणार आहेत. महिला -मुलींच्या सुरक्षितता व बसण्याच्या संदर्भात समितीने चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली असून या वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार आहे. 26 सप्टेंबर. रोजी घटस्थापना दिनी सायं.7 वा. मुंगीलाल विद्यालय प्रांगणात गरबा महोत्सवाचे उदघाटन होईल.
यावर्षी दर्शकांचा प्रवेश हा पारंपरिक गेटमधून न होता तो सर्वोपचार रुग्णालय समोरील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिल्या जाणार आहे. आतच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून जुन्या प्रवेश द्वारासमोर आता भव्य स्टेज राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घट स्थापना, दैनिक चंडीपाठ, दैनिक आरती, पूजन करण्यात येत असते तर अष्टमी दिनी प्रांगणात होम हवन करून शुचिर्भूतता निर्माण करण्यात येत असल्याचे यावेळी लाखानी यांनी सांगितले. यावर्षी महोत्सवात फूड झोनमध्ये स्वादिष्ठ व्यंजनासोबतच आनंद मेळ्याच्या धर्तीवर विविध प्रकारच्या खेळांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.उ त्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच उत्तम गरबा खेळणाऱ्या तीन महिला-मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी हा महोत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी समितीच्या वतीने आयएमए, रोटरी, लायन क्लब, इनरव्हील समवेत अनेक सेवाभावी सामाजिक संस्था संघटनाना व राज्य व राष्ट्रातील ख्यातनाम मान्यवरांना महोत्सवात निमंत्रित करून त्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. यावेळी समिती अध्यक्ष वालजी पटेल, महिला मंडल अध्यक्ष शितल रुपारेल, दिलीप सोनी, आशिष वखारीया, विनोद धाबलिया, मनोज भीमजियानी, प्रकाश लोढिया, अरविंद पटेल, भरत मकवाना आदी उपस्थित होते.