सोलापूर : विद्यार्थी आधार क्रमांक नोंदणीचे काम 100 टक्के पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्याला 21 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्याप्रमाणे 19 ते 21 सप्टेंबरदरम्यान खास शिबिरे घेण्याचे ठरले होते. दुसरीकडे पुण्यातील नोंदणीचे काम आधी होण्यासाठी शिक्षण विभागाने सोलापूरसाठी विद्यार्थी संकेतस्थळ बंद ठेवले आहे. त्यामुळे मुदतीत उरलेले काम होणे शक्य नाही. हे पाहात आता मुदतवाढ देण्याची तयारी शिक्षण विभागाने दाखवली आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत नोंदणी करण्यासाठी पुणे जिल्ह्याला प्राधान्य देत सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यार्थी संकेतस्थळ बंद ठेवले आहे. पुण्याचे काम झाले की, सोलापूरला संधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात विद्यार्थी आधार नोंदणीचे 85 टक्के काम झाले आहे. उर्वरित कामासाठी 21 सप्टेंबरची मुदत होती. 19 ते 21 सप्टेंबरदरम्यान खास शिबिरे भरवून नोंदणी 100 टक्के पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले होते.
गेल्या दोन दिवसांपासून संकेतस्थळ बंद आहे. शाळा व मुख्याध्यापकांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यात एकूण 8 लाख 87 हजार 980 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 7 लाख 55 हजार 611 जणांची आधार नोंदणी झालेली आहे. 1 लाख 32 हजार 369 जणांची नोंदणी झालेली नसून, त्याचे आधार कार्डच नाहीत. शिक्षण विभागाकडून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार कार्डसह माहिती जमा करणे आवश्यक आहे. शाळांना आधार कार्डची सक्ती करूनही अद्याप विद्यार्थ्यांची माहिती अपडेट नाही. यासंदर्भात शिक्षण विभागाशी संवाद साधला असता त्यांनी ‘वरूनच तांत्रिक कारणामुळे बंद आहेत, शाळांना नोंदणी करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात येणार आहे’, असे सांगितले. शिक्षण संचालक कार्यालयाच्या माहितीनुसार पुण्यातील बऱ्याच शाळांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे प्रलंबित आहे. तरी दोन दिवस पुणे विभागाला दिलेले आहेत. पुण्याचे झाल्यानंतर सोलापूर व अहमदनगरला आधार लिंक करण्यासाठी अॅक्सेस दिले जाणार आहे. मात्र सध्या पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे.