अमरावती : अकोला मार्गावरील दडबडशहा दर्गा येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. 15 सप्टेंबरला दर्गाचे मुजावर (पुजारी) अनवर बेग अकबर बेग व तेथेच राहणारा तौफिफ शेख राजीक शेख यांचा अतिशय क्रूरतेने खून केला होता. लक्ष्मण गोरख पिंपळे तळवे (41, तळोजा, नंदुरबार, ह.मु. लालखेड ता. चांदुर रेल्वे) आणि दीपक पन्ना पवार (25, रा. बहिलोलपुर, नांदगाव खंडेश्वर) असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्यांचे नाव आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना घटनेच्या अनुषंगाने सर्व बाबींचा बारकाईने व सखोल तपास करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, यातील लक्ष्मण गोरख पिंपळे हा मागील बरेच वर्षापासून दडबड शहा दर्गा येथे राहून काम करीत होता. भाविकांकडून मिळणाऱ्या पैसे, देणगीमधून आपला उदरनिर्वाह करीत होता. परंतु काही दिवसापूर्वी अनवर शहा अकबर शहा (रा. लालखडी, अमरावती) हा तेथे नवीन मुजावर म्हणून देखरेख करीत होता.
लक्ष्मण गोरख पिंपळे याचे काही दिवसांपूर्वी अनवर बेग अकबर बेगसोबत वाद निर्माण झाल्याने अनवर बेग याने लक्ष्मण गोरख पिंपळे यास तेथे राहण्यास मनाई केली होती. त्यामुळे लक्ष्मण गोरख पिंपळे हा मुळगावी निघून गेला. परंतु लक्ष्मण पिंपळे याच्या मनामध्ये अन्वर बेग विरुध्द रोष असल्याने त्याने बेलोलपुर येथे राहणारा दिपक पवार याच्या मदतीने दडबडशहा येथील मुजावर (पुजारी) अनवर बेग अकबर बेग व तेथेच काम करणारा तौफिक शेख राजीक शेख या दोघांची सुरा या हत्याराने गळ्यावर वार करत हत्या केली. ही कारवाई लोणी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी केली आहे. मागील चार दिवसांपासून सात अधिकारी व 35 अंमलदार या पथकात कार्यरत होते. ही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांना पोलीस अधीक्षकांनी भरघोस रीवार्ड जाहीर केला आहे. अशी माहिती सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे.










