अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी अखेर सोमवारी (19 सप्टेंबर) डॉ. शरद रामराव गडाख यांच्या नावाची घोषणा झाली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. प्रा. डॉ. विलास भाले यांचा कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला पूर्ण झाल्याने त्यापूर्वीच ऑगस्ट महिन्यापासून नवीन कुलगुरू पदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली होती. या पदासाठी 30 हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची छाननी करून इच्छुक पात्र उमेदवारांची प्राथमिक मुलाखत, सादरीकरण होऊन निवड समितीने पाच उमेदवारांची शिफारस राज्यपालांकडे केली होती. या पाच इच्छुकांच्या 7 सप्टेंबरला मुंबईत राजभवन येथे मुलाखती पार पडल्या. त्यानंतर राज्यपालांकडून कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडे लक्ष लागले होते. दरम्यान डॉ. भाले निवृत्त झाल्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. अखेर सोमवारी डॉ. शरद रामराव गडाख यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
विद्यापीठ सूत्रांच्या मते कुलगुरूपदाच्या शर्यतीत परभणी येथील संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, राहुरी येथील संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथील डॉ. विजय वाघमारे व भारतीय मृदा विज्ञान संस्थान भोपाळ येथील डॉ. पात्रा आदी शर्यतीत होते. 20 ऑक्टोबर 1969 रोजी स्थापन झालेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विदर्भातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. आतापर्यंत विद्यापीठाचे 20 कुलगुरू झाले असून डॉ. गडाख हे 21 वे कुलगुरू ठरले आहेत. विदर्भात कृषी विद्यापीठ असूनही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांनी हा प्रदेश चर्चेत राहतो. त्यात ज्या पश्चिम विदर्भात विद्यापीठ आहे. तेथे अनेक प्रश्नांना शेतकरी तोंड देतात. शेतकरी आत्महत्या, दरवर्षी मानगुटीवर बसलेले बोंडअळी किडीचे संकट, उगवण क्षमतेत कमी उतरणारे बियाणे आदी अनेक प्रश्नांना शेतकरी तोंड देत असल्याने पांढरा हत्ती म्हणून विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जातो, अशा व यासंदर्भातील अनेक प्रश्नांवर कुलगुरूंना काम करावे लागणार आहे.