अकोला : पाणीपट्टी देयक चुकीचे आले असल्यास या संदर्भात शहरालगतच्या नेहरु पार्क चौकातील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात याबाबत तक्रार देता येणार आहे. तसेच लिकेजची माहिती या ठिकाणी देता येईल. त्यामुळे नागरिकांनी देयक दुरुस्ती करुन पाणीपट्टीचा भरणा करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. तांत्रिक कारणामुळे नळधारकांना वितरीत करण्यात आलेल्या पाणीपट्टी देयकांमध्ये काही भागात अधिक प्रमाणात पाणीपट्टीची रक्कम आलेली आहे. यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाने विविध भागात नगरसेवक तसेच नागरिकांच्या मागणी वरुन पाणीपट्टी देयक दुरुस्ती शिबिरही घेतले आहेत. यापुढेही कोणी मागणी केल्यास पाणीपट्टी देयक दुरुस्ती शिबिर घेतले जाईल. त्याच बरोबर देयका बाबतच्या तक्रारी तसेच लिकेज बाबतही नागरिकांच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागात दिल्या जातात.
या सर्व तक्रारी निकाली काढण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसौय टाळण्यासाठी आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये नेहरू पार्क जलकुंभ, नेहरू पार्क जवळ असलेल्या कार्यालयात तक्रार निवारण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. नागरिकांनी पाणीपट्टी देयक दुरुस्ती बाबत संपर्क साधावा. पाणीपट्टी देयक दुरुस्ती करताना नळाच्या मिटरची पावती देखिल सोबत आणावी. तसेच आपल्या राहणाऱ्या परिसरात तसेच अन्य कोणत्याही ठिकाणी जलवाहिनी फुटलेली आढळल्यास त्याबाबतची तक्रार वजा माहिती देखिल या निवारण केंद्रात देता येणार आहे. पाणीपट्टी देयकात दुरुस्ती केल्या नंतर पाणीपट्टीचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे. नळ धारकांचे पाणीपट्टीचे देयक महापालिका जलप्रदाय विभागात स्विकारले जातात. ज्या नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत आहे तसेच नळजोडणी अवैध आहे, अशा नळधारकांनी नळजोडणी वैध करुन घ्यावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी केले आहे. शहराच्या गल्ली बोळात कचरा संकलन करणाऱ्या कचरा घंटा गाडीच्या माध्यमातूनही पाणीपट्टी देयक दुरुस्ती तसेच थकीत पाणीपट्टीचा भरणा करण्याचे आवाहन लाऊड स्पिकरद्वारे पाणी पुरवठा विभागाच्या वतीने केले जात आहे.











