ऋषिकेश ओझा
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विधमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची काल एकमताने निवड करण्यात आली, तर सरचिटणीसपदी हेमंत रासने निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ही निवड पुढील २ वर्षांकरीता करण्यात आली आहे. माणिक चव्हाण हे ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. माणिक चव्हाण हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक , सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. ट्रस्टने यापूर्वी घोषणा केल्यानुसार १५ सप्टेंबर रोजी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पुढील १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष देखील यावेळी एकमताने ठरविण्यात आले. विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, अक्षय गोडसे, अमोल केदारी, कुमार बांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.