चंद्रकांत श्रीकोंडवार
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : प्रधानमंत्री स्व निधी योजना अंतर्गत अल्प मुदतीत कर्ज घेऊन रोजगार उभा करणाऱ्या लोकांसाठी बँक व्यवस्थापनाचा दिरंगाईचा कारभार अडसर ठरित होता. खासदार सुनील मेंढे यांनी मोहाडी येथील बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाला फायलावर घेतल्यानंतर तात्काळ 13 प्रकरणे मंजूर करण्यात आली. हातावर पोट असलेल्या अशा लोकांची प्रकरणे अडवून ठेवू नका आणि ती तत्काळ मंजूर करा असे निर्देश खासदारांनी आता जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रबंधकांना दिले आहेत. हातावर पोट असलेल्या फेरीवाले, फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोजगार उभा करता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम स्वयं निधी योजना सुरू केली. अल्पमुदतीचे कर्ज या माध्यमातून देण्यात येते. मात्र या प्रकरणांकडे बँक व्यवस्थापन गांभीर्याने पाहत नाही. विशेष करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हा विषय दुर्लक्षित केला जातो. मोहाडी येथील बँक ऑफ बडोदा मध्ये भाजी विक्रेता अजय तरारे यांच्यासह अनेकांची प्रकरणे धुळखात पडली असल्याची तक्रार खासदार सुनील मेंढे यांचेकडे करण्यात आली. माहिती होताच तुमसर मोहाडी दौऱ्यावर असलेल्या खासदारांनी ९ सप्टेंबर ला मोहाडी बँक व्यवस्थापकाला यासंदर्भात जाब विचारला होता. अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत चांगलेच धारेवर धरले होते. अखेर बँकेकडे पडून असलेली १३ प्रकरणे बँकेने आता मंजूर केली आहेत. या लोकांच्या व्यवसायाला आता हातभार लागणार आहे. गरजूंच्या मदतीसाठी हा निधी असला तरी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे तो कामी पडत नाही. असा प्रकार भविष्यात होऊ नये याची काळजी सर्व बँक व्यवस्थापकांनी घ्यावी. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हाच्या जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रबंधकांनी सर्व बँकांमधील अशी प्रकरणी तात्काळ निकाली निघतील या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देशही देण्यात आले. खासदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांच्या हाती पैसा पडल्याने त्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.