कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : आंतरराष्ट्रीय सॉफ्ट बॉल प्रशिक्षक मुकुल माधवराव देशपांडे यांचा सत्कार श्री सरस्वती शिक्षण संकुलात घेण्यात आला. राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर संपन्न झालेल्या स्पर्धेत पदक विजेते व केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स अँथॉरिटी ऑफ इंडिया, नॅशनल स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, पटीयाला, पंजाब येथे प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी साॅप्ट बॉल मुख्य प्रशिक्षक म्हणून सरस्वती संकुल चे माजी विद्यार्थी तथा विद्यमान शिक्षक मुकुल देशपांडे यांचा क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव सरस्वती शिक्षण संकुलात संस्थेचे अध्यक्ष ॲड मोहनराव आसरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुकुल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना “जेवढे शिक्षणाला महत्त्व देता तेवढेच खेळाला महत्त्व दिले तर आपले भवितव्य उज्वल करता येते. हा सत्कार मला अधिक कार्य करण्यास प्रेरणा देईल”, असे सांगितले. याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक माधवराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मंजिरीताई देशपांडे, सेवा निवूत्त शिक्षक पद्माकरराव महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ रश्मी देशपांडे यांच्या सरस्वती स्तवनाने करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक भूषण ठाकूर यांनी केले. कार्यक्रमात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थी सोमेश हेंद, दीप पांडे वेदिका थोरात, प्रेरणा पोहोरकर, कृष्णा थोरात तसेच विज्ञान प्रदर्शनीतील तृतीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी नितीन शंके, विज्ञान मेळाव्यातील द्वितीय क्रमांक पटकावलेली हर्षदा गजानन इंदाने या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विवेक बोडखे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका संगीता धर्मे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


