रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड प्रकल्पातून लोहखनिज वाहून नेणाऱ्या वाहनामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रापमने बस बंद केली.यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त झालेले गावकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी सुरजागड प्रकल्पाचे ट्रक रोखुन धरले व बस सुरळीत सुरू करण्याची मागणी केली. सुरजागड प्रकल्पातून लोहखनिजाचे उत्खनन करुन येथील चुरा दगड उचल करण्यासाठी त्रीवेणी अर्थ मुव्हर्स कंपनीद्वारे विविध जिल्ह्यातील व राज्यामधील अनेक ट्रान्सपोर्टचे ८०० ते १००० पेक्षा जास्त वाहने सुरजागड लोहखनिज प्रकल्पात लावले आहेत. याच वाहनाने एटापल्ली ते चंद्रपुर या राष्ट्रीय महामार्गावरून लोहयुक्त दगड वाहतूक सुरू आहे.मात्र वाहतुकीमुळे या महामार्गावर मोठे मोठे खड्डयांचे जाळे निर्माण झाल्याने या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व शाळकरी विध्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. रस्त्याची दुरवस्था झाल्याने अहेरी बस आगाराकडून बस सेवा सुद्धा बंद करण्यात आली.यामुळे बोरी व राजपुर पँच ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरिक, पालक तसेच युवकांनी भर पावसात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सुरजागड प्रकल्पाच्या वाहनांना तीन ते चार तास बोरी मुख्य चौकात अडवून धरले.या घटनेची माहिती अहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक पंकज बोनसे यांना कळताच त्यांनी आपल्या चमुसह अहेरी आगाराचे आगार प्रमुख युवराज राठोड यांना सुद्धा घेऊन बोरी येथे दाखल झाले. त्यांनी मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर आलापल्ली ते आष्टी या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.
यावेळी बोरी ग्रामपंचायत चे सरपंच शंकर कोडापे, उपसरपंच पराग ओल्लालवार, सदस्य महेश सेडमाके राजपूर पँच ग्रामपंचायत चे सदस्य मधूकर वेलादी,सुरेश गंगाधरीवार, शंकर सिडाम, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार,अशोक वासेकर,विजय कोकीरवार, राजेश नम्बीयार,रामलू कुळमेथे, पांडूरंग रामटेके,पोचू मंचालवार,अंकीत दुर्गे, पांडूरंग बोमकंटीवार,राजन्ना संगर्तीवार,यांच्यासह बोरी व राजपूर पँच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.