जितेंद्र लखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, हिवरखेड
हिवरखेड : येथील मरुधर धाम पी.पी. जिनिंग फॅक्टरीच्या सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री रामदेव बाबा यांचे भव्य जम्मा जागरण संपन्न झाले. संपूर्ण राजस्थानी समाजाचे आराध्य श्री.रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित जम्मा जागरण चे हिवरखेड रामदेवबाबा सेवा समिती तर्फे भव्य आयोजन करण्यात आले होते. पी.पी जिनिंग फॅक्टरी, अकोट रोड हिवरखेडच्या प्रांगणात हा भक्ती सोहळा दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध जम्मा गायक आर्वी येथील डॉ.देवेंद्रजी राठी यांच्या सुमधुर वाणी तून तसेच आगळ्या वेगळ्या शैलीत सोहळ्या ची सुरुवात करून उपस्थित भाविकांना भक्ति रसात तल्लीन केले.श्री.रामदेव बाबा जम्मा जागरण कार्यक्रमात पांढरी येथील महंत श्री नरेश बाबा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
श्री. रामदेव बाबा यांच्या प्रतिमेला वैदिक मंत्रोच्चाराने अभिषेक करून, ज्योत प्रज्वलित करून सोहळ्याची सुरुवात झाली. दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजता सुरुवात झालेल्या या धार्मिक कार्यक्रमात गायक डॉ. देवेंद्रजी राठी यांनी आपल्या सुरेल आवाजात उपस्थित भाविकांची मने भरून घेतली. खम्मा खम्मा, कीर्तन की है रात, “मैं वारी जाऊ बालाजी” या रसाळ भजना मुळे भाविकांनी ताल धरला. या सोहळ्यात रामदेवबाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित जन्म, विवाह, हरजी भाटी आणि सुगणाबाईंच्या विलापाचे चित्रमय सादरीकरण करण्यात आले. यावेळी भजन कीर्तन, मूर्ती श्रृंगार, छप्पन भोग आदी करून प्रसाद वाटप करण्यात आला.
सदरहू सोहळ्याला अडगांव, अकोट, अकोला, तेल्हारा, मालेगाव,सोनाळा,टुणकी, जळगाव,जामोद,मलकापूर, बुलडाणा, संग्रामपूर, शेगाव, अमरावती येथून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित झाले. भाविकां च्या स्वागतासाठी संपूर्ण शहर कमानींनी सजले होते. जम्मा जागरण मध्ये आलेल्या सर्व भक्त जणांसाठी भोजन प्रसादीची व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. रामदेवबाबा सेवा समिती हिवरखेड व समाजातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.











