ज्ञानेश्वर कापसे
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : वारजे महामार्गावरील डुक्कर खिंड ते स्व . रमेश वांजळे हायवे चौकापर्यंत महामार्गसह सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत . या खड्डयात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने आदळून अपघातग्रस्त होत आहेत . त्यामुळे दुचाकीचालकांसह चारचाकीचालकांना अक्षरश : जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे येथील खड्डे बुजवून महामार्ग प्रशासनाने रस्ता त्वरित पूर्ववत करावा , अन्यथा तीव्र आंदोलन करू , असा इशारा वारजे हायवे विकास प्रतिष्ठानकडून देण्यात आला . महामार्ग प्राधिकरणकडे याबाबतचे निवेदन माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ , माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ , निवृत्ती येनपुरे , महादेव गायकवाड , सुरेश जाधव , अरुण पाटील आदींनी दिले . महामार्ग प्राधिकरणकडून या निवेदनाची दखल घेत महामार्ग व सेवा रस्त्यावरील सर्व समस्यांची पाहणी करण्यात आली असून , महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात येणार आहेत , अशी माहिती महामार्गाचे भरत तोडकरी यांनी दिली .