रविकुमार येमुर्ला
ग्रामीण प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा : तालुक्यातील बामणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गंगनूर जंगल परिसरात चारण्यासाठी गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला करुन 7 बक-यांची शिकार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. एकाचवेळी वाघाने सात बक-या ठार केल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार बामणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या येनलाया या गावातील मडे बक्का येल्ला हा इसम नेहमीप्रमाणे शुक्रवारी बक-या चराईसाठी सिरकोंडा जंगलात गेला होता. दरम्यान सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास गंगनूर जंगल परिसरात बक-या चारत असतांना एकाएक वाघाने कळपावर हल्ला चढविला. या हल्ल्यात सात बक-या ठार झाल्या. याची माहिती येल्ला यांनी वनविभागाने दिली. बामणी क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिका-यांनी पथक पाठवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मागील पंधरवड्यापूर्वी आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील गेरपल्ली जंगलात वाघाने एका बैलासह 2 बक-या, 1 म्हैस ठार केली होते. यामुळे सिरोंचा वनपरिक्षेत्रात वाघाचा धुमाकूळ कायम असल्याने या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. हा हल्ल्यामुळे बामणी परिसरातील लोकांमध्ये एक दहशत पसरली असून जंगलात एकटा जाण्यास टाळत समोर येत आहे..