कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
उमरखेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, मिलिंद महाविद्यालय मुळावाचे मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांच्या ‘हुंकार ‘या कवितेचा समावेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने बी .एससी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात केला आहे .हुंकार पाहिला मी हुंकार पाहिला ,भाकरीत जळताना फनकार पाहिला मी , आता करू नका रे भाषा विद्रोहाची , पिंजर्यात वाघांचा सत्कार पाही ला मी ‘ , या त्यांच्या गेय कवितेच्या ओळी आता अमरावती विभागातील महाविद्यालयीन तरुणांच्या ओठावर लवकरच रुळणार आहेत .डॉ . अनिल काळबांडे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून प्रबोधनकार ,साहित्यिक, कवी समाजसेवी या वेगवेगळ्या अंगाने त्यांनी आपला परिचय या परिसराला दिलेला आहे .त्यांची साहित्य संपदा हुंकार काव्यसंग्रह ,करुणेची ओल काव्यसंग्रह , सर्वांसाठी बाबासाहेब , रमाई माऊली ,सावित्रीबाई फुले ,वामनदादा कर्डक, राजश्री शाहू महाराज , याच बरोबर ‘वेगळे जग ‘हे प्रवास वर्णन तर देशीकार . लेण रविचंद्र हडसनकर हे संशोधन ग्रंथ त्यांनी लिहिले आहे . महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे व्दारा निर्मित बारावीचे युवकभारती मराठी पुस्तकाच्या संपादक मंडळात त्यांनी काम केले आहे . यापूर्वी त्यांच्या साहित्याला ‘राजा ढाले वैचारिक लेखन पुरस्कार ‘ त्यांच्या काव्यसंग्रहाला अस्मितादर्श उत्कृष्ठ लेखनपुरस्कार , छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार , महाकवी वामनदादा कर्डक स्मृती पुरस्कार , जागतिक बौद्ध धम्म परिषदेचा प्रबुद्ध भारत साहित्यरत्न पुरस्कार , डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव पुरस्कार , दिल्ली येथील नॅशनल एक्सलंस अर्वाड यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे . मराठी साहित्याला सातासमुद्रा पार नेण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे .त्यांन थायलंड ,दुबई, मलेशिया ,इंडोनेशिया ,श्रीलंका भूतान , तायवान , मालदीव या देशात शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहेत . ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी विषयाचे पीएचडी चे मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेल व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे बाह्य परीक्षक म्हणून कार्यरत आहेत .त्यांनी अनेक साहित्य संमेलनातून आपल्या साहित्याचा ठसा उमटलेला आहे .संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाकरिता निवडल्या गेलेल्या त्यांच्या काव्याने यवतमाळ जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात निश्चितच ही गौरवाची बाब आहे .