विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : भारतीय चलनात भारतीय रिझर्व बॅंकेने जारी केलेले दहा रुपयांचे (१० रुपये) नाणे काही ठिकाणी स्विकारण्यास नकार दिला जात आहे, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. तथापि, अशा प्रकारे नाणे स्विकारणे हे बंधनकारक असून भारतीय रिझर्व बॅंकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार अशाप्रकारे भारतीय चलन स्विकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तो शिक्षेस पात्र ठरु शकतो,असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली असून अशा प्रकारे चलनातील नाणी स्विकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध भा.दं.वि. कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करावी,असे निर्देशही पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. यासंदर्भात भारतीय रिझर्व बॅंकेने दिलेल्या दिशानिर्देशांनुसार, अशाप्रकारे रिझर्व बॅंकेने जारी केलेले चलन स्विकारण्यास कुणीही नकार देऊ शकत नाही. अशा प्रकारे बॅंका अथवा व्यापारी, व्यक्ती कायदेशीर चलन स्विकारण्यास नकार देत असतील तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. दहा रुपयांचे नाणे हे राष्ट्रीय चलन आहे. भारत सरकारने वाहकाला चलनाचे मूल्य देण्याचे वचन दिल्याने ते नाकारण्याचा अधिकार कोणालाही नाही. भारतीय चलन स्विकारण्यास नकार देणाऱ्यांविरुद्ध भादंवि कलन १२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. गुन्हा दाखल करण्यासाठी नाणे नाकारणाऱ्या व्यक्तिकडून लेखी स्वरुपात नाणे नाकारण्याचे कारण घ्यावे. त्याचा तपशील स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलीस संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करतील. या गुन्ह्यात दंडासह तीन वर्षाचा तुरुंगवास अशी शिक्षेची तरतूद आहे,असे रिझर्व बॅंकेच्या निर्देशांत म्हटले आहे.