औरंगाबाद : प. महाराष्ट्र आणि कोकणात धो…धो बरसल्यानंतर पावसाने मराठवाड्याला जोरदार दणका दिला. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने एक गाव रात्रभर पाण्यात होते. अनेक गुरे आणि वाहने वाहून गेली आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेती आणि घरांचे नुकसान झाले. भोकर तालुक्यात भुरभुशी येथे जनावरे चारण्यास शेतात गेलेल्या एका मुलीचा वीज पडून मृत्यू झाला. मुखेडमध्ये एक शेतकरी पुरात वाहून गेला. उस्मानाबाद, लातूर, जालना येथेही जोरदार पाऊस झाला. जळगावमध्ये पाचोरा परिसराला पावसाने दणका दिला. विदर्भात गडचिरोलीत पूरस्थिती आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात पुण्यातील दाेघांचा समावेश आहे. याशिवाय बीडमधील ११ भाविक पूरस्थितीत अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.