सोलापूर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या गाभाऱ्यात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. पहाटे ३ वाजून १० मिनिटाच्या सुमारास विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत गेवराई (ता. बीड) च्या नवले दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुरली भगवान नवले (वय ५२) व जिजाबाई मुरली नवले (४७) यांनी शासकीय महापूजा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत केली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे सपत्नीक उपस्थित होते. शिवाय मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी दिलीप स्वामी याच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनामुळे मागील दोन वर्ष निर्बंधात पंढरपुरातील आषाढी वारी पार पडली होती. मात्र यंदा आषाढी वारी निर्बंधमुक्त पार पडत आहे. वारीसाठी राज्याच्या कानाकोपर्यातून १२ लाखांहून आधिक भाविक दाखल झाले आहेत. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरासोबतच चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी लाखो वारकर्यांची एकच गर्दी झाली आहे. विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी ८ तासांहून अधिक वेळ लागत आहे तर पदस्पर्श दर्शनासाठी १४ तासाहून अधिक वेळ लागत असल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सर्वच मानाच्या संतांच्या पालख्या पंढरीत दाखल झाल्या तर मुख्यमंत्रीही रात्री उशिराने पंढरीत दाखल झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आज रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.