मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हरभरा ,गहू ,कापूस, उत्पादक शेतकऱ्यांनी पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर खाली जमिनीला नांगरून ठेवावी जेणेकरून भविष्यात जमिनीत ओल टिकून ठेवण्यास मदत होईल असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी तेल्हारा मिलिंद वानखेडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.मिलिंद वानखेडे यांनी शेतकऱ्यांना या बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की,भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोश अवस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटाश, कॅल्शियम, मेग्नेशियम यांची घनता वाढते. अपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबी मध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोल पर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते, त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी होतो. जमीन ओळी राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते ,त्यामुळे सूक्ष्म अन्न द्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी शेतकऱ्यांना दिली प्रगतशील शेतकरी सचिन कोरडे ,दीपक कोरडे ,अमित डोबाळे , गोपाल कोरडे ,संतोष वाघ ,शिवशंकर कोरडे ,सुधाकर कोरडे ,शुभम वाघ ,महेश खोने ,आदी शेतकरी उपस्थित होते.