कामगाराचा मृत्यू झाल्याने केला संताप व्यक्त
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२२:-येथून जवळच असलेल्या बरांज (मोकासा) येथील कर्नाटका एम्टा कोळसा खदानी तील एका कामगाराचा आर्थिक चणचणीमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण कामगारांनी मंगळवारी खदान बंद पाडली. शेषराव चिंतामण कोरडे (३२) रा. बरांज (मोकासा) असे मृत कामगाराचे नाव असून तो सध्या भद्रावती शहरातील गवराळा वस्तीत वास्तव्य करीत होता. काल दि.२१ मार्च रोजी त्याचा आजाराने मृत्यू झाला. कर्नाटका एम्टा कंपनी कामगारांना कामाचा अत्यंत कमी मोबदला देत असल्यामुळे कामगारांची स्थिती हलाखीची असते. अशा परिस्थितीमुळेच शेषराव कोरडे या युवा कामगाराला आपला जीव गमवावा लागला असा आरोप करत कामगारांनी आज दि.२२ मार्च रोजी सकाळी १० वाजता कामबंद आंदोलन केले. दरम्यान, कामगारांच्या भावनांचा विचार करता कंपनीने मृत कामगाराच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच इतर लाभ देण्याची घोषणा केली. कामगारांच्या इतर मागण्याही मान्य करण्याचे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.