मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
तेल्हारा : संपूर्ण भारतात आपल्या कार्य कर्तृत्वाने अजरामर झालेल्या व भारतवर्षाला प्रेरणा ठरलेल्या थोर मातांची शाळा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खंडाळा येथे भरली. शिक्षण, संस्कृती, राजकारण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राजामाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, प्रतिभाताई पाटील, रमाई, भीमाई, इंदिरा गांधी, लता मंगेशकर, सिंधूताई सपकाळ यांच्यासह थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीरेखा विद्यार्थिनीनी साकारल्या. थोर मातांनी त्यांच्या जगण्याची वाटचाल उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडली. व्यक्तीरेखा रेखाटणाऱ्या विद्यार्थिनीना जेष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले यांच्या माऊली व असा कसा शेतकरी ह्या कवितेचे पोस्टर मुख्याध्यापक शीला टेंभरे, जेष्ठ शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुळशिदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले यांच्या हस्ते भेट देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल मोहे, संचालन सुरेखा हागे तर आभार निखिल गिऱ्हे यांनी मानले.