महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि चंद्रपूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथील नवनिर्माण समपातळी झालेल्या तालुका क्रीडा संकुलामध्ये दि.२५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर टच रग्बी स्पर्धेत मुलांच्या स्पर्धेत कोल्हापूर, तर मुलींच्या स्पर्धेत परभणी संघ प्रथम स्थानी राहिले. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील ३५ जिल्हा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन आ.प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी वेकोलि कुचना क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक गुप्ता, नगराध्यक्ष अनिल धानोरकर,रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे विकास चौरसिया, तालुका क्रीडा अधिकारी विजय ढोबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.दि.२७ फेब्रुवारीला अंतिम सामने खेळल्या गेले. त्यात मुलांच्या संघात विजेता संघ कोल्हापूर वउपविजेता संघ मुंबई उपनगर राहिला.तसेच तृतीय क्रमांक बीड जिल्ह्याने पटकाविला.मुलींच्या संघात विजेता संघ परभणी व उपविजेता संघ उस्मानाबाद तसेच तृतीय क्रमांकांवर सोलापूर संघ राहिला. बक्षीस वितरण समारंभात या सर्व संघांना चांदा आयुध निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक विजयकुमार,नगराध्यक्ष अनिल धानोरकर,उप महाव्यवस्थापक आणि क्रीडा अधिकारी भारतीय, कनिष्ठ श्रम व्यवस्थापक उज्ज्वल किशोर मिश्रा, क्रीडा सचिव एन. पी. मलिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रभारी आणि जेटी सचिव डॉ. दिलीप बगडे, ॲड. मिलिंद रायपूरे,देहारकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमधून महाराष्ट्र संघाची निवडसुद्धा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.संगीता बांबोडे यांनी केले. तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन डॉ. राकेश तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत निकोडे, दिनेश धानोरकर, प्रफुल्ल पतरंगे, अमर भांडारवार, नेहाल डांगे, संजय बेलेकर, अलोका बिश्वास, लता इंदुरकर, प्रा.संगीता बांबोडे, विद्या किन्हाके यांनी सहकार्य केले.


