महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यात गेल्या चार महीन्यांपासून रोजगार हमी योजनेतील कामाला सुरूवात झाली असून कामाच्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असून मजुरांच्या जाबकार्डकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मजुरांकडून केला जात आहे.मजुरांच्या जाबकार्डमध्ये कामाचे दिवस व त्यानुसार पडलेली मजुरी याबाबतच्या नोंदी करणे मजुरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या मुख्य कामाकडे रोहयो यंत्रणेचे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातील अनेक ग्राम पंचायती अंतर्गत येत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहे. त्यात पांदण रस्ते , तलावाचे खोलीकरण, बोळी नुतणीकरण, मजगी यासारखे जास्त मजुरांना जास्त दिवस काम देणाऱ्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र या सुरु असलेल्या अनेक कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष फेरफटका मारला असता मजुरांना कामाबाबत माहीती व्हावी म्हणून कामाच्या ठिकाणी माहीतीफलक व दरपत्रक दिसून आले नाही . कामावर मजुरांना पाणी पिण्यासाठी किंवा दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा आराम करण्यासाठी मांडवाची कसलीही व्यवस्था नसल्याने मजुरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काही मजुरांनी स्वत:च मांडव तयार करुन उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काम करताना मजुराला मार लागला किंवा शरीराला त्रास झाला तर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यासाठी आरोग्य पेटी नाही. कामावर येणा – या मजुरांच्या लहान मुलांना दिवसभर घरी सांभाळण्यासाठी कोणीही नसल्यामुळे पालक त्यांच्या लहान मुलांना कामाच्या ठिकाणी घेऊन येतात. त्या लहान मुलांना सांभाळण्याची किंवा पाळणा घराची व्यवस्था नाही. मजुरांनी केलेल्या कामाच्या नोंदी त्यांचे जाबकार्डमध्ये दर आठवड्याला नियमित भरल्या जात नाही. अनेक मजुरांना जाबकार्ड नंबर दिलेला असला तरी जाबकार्ड अजुन पर्यंत दिले नसल्याची कामावरील अनेक मजुरांकडुन माहीती मिळाली आहे. ज्या मजुरांजवळ जाबकार्ड आहे, त्यातील अनेक जाबकार्ड कोरेच आहेत. त्यामुळे रोजगार हमीच्या कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येणार की नाही. याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रोहयो कामाचे ठिकाणी नियमाप्रमाणे मजुरांना आवश्यक सुविधा व मजुरांनी केलेल्या कामाच्या नोंदी जाबकार्ड मध्ये त्वरीत कराव्यात यावी अशी मागणी रोहयो मजुरांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात रोहयो कार्यकर्ते शंकर भरडे यांनी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार यांच्याकडे दि.१४ फेब्रुवारी रोजी लेखी निवेदन सादर करुन मजुरांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली. तसेच या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती आपल्या पत्त्यावर पाठवावी अशीही मागणी निवेदनात भरडे यांनी केली आहे. परंतु अद्याप कोणतीही माहिती दिली नसल्याचे भरडे यांचे म्हणणे आहे.
—-हा रोहयो मजुरांचा हक्क आहे
रोजगार हमी कायद्यानुसार कामाचे मागणीप्रमाणे काम व कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळणे हा रोहयो मजुरांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे मजुरांनी केलेल्या कामाचे दिवस व केलेल्या कामाची मजुरी ही दर आठवड्याला मजुरांच्या जाबकार्डमध्ये नोंद करुण देणे ही रोहयो यंत्रणेची जबाबदारी आहे . त्यामुळे रोहयो मजुरांनी केलेल्या मागण्या योग्यच आहेत.
शंकर भरडे
रोहयो कार्यकर्ता
दोन बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत.
मजुरांच्या सुविधा संदर्भात दोन बैठका घेतल्या असून त्यात ग्रामसेवक व रोजगार सेवक यांना मजुरांना सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.तर काही ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्न चालू आहेत.
डॉ.मंगेश आरेवार गटविकास अधिकारीपं.स.भद्रावती.


