अकोला,दि.२ – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी (माध्य/उच्च माध्यमिक), क्रीडा भारती, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान संघ, अजिंक्य फिटनेस क्लब, अकोला जिल्हा योगासन संघटना, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्य नमस्कार दिन निमित्ताने व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त रविवार दि.६ रोजी आभासी (ऑनलाईन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थी, युवक व नागरीकांमध्ये योग विषयक आवड निर्माण करणे या उद्दिष्टासाठी योगाचा प्रसार करण्याकरीता सूर्य नमस्कार दिनाचे औचित्य साधून तसेच कोरोना – १९ विषाणूचा प्रादुर्भाव पाहता ऑनलाईन (आभासी) पद्धतीने कोरोना नियमांचे पालन करून, सूर्य नमस्कार दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.
सूर्य नमस्कार बाबत माहिती व त्याचे लाभ या विषयावर पतंजली योग समितीचे सुहास काटे, स्वाभिमान संघटनाचे सारिका तिवारी, अकोला जिल्हा योगसन संघटनेचे प्रशांत पाटील, अजिंक्य फिटनेस पार्कचे धनंजय भगत मार्फत २६ तासांचा सूर्य नमस्कार मॅरेथॉनचे आयोजन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध योग संघटनांनी व योगासन संबंधी सर्व संस्था, मंडळे यांनी आपल्या स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने सूर्य नमस्कार प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करावे. जेणेकरून जिल्ह्यातील बहूसंख्य नागरिकांना सहभागी होता येईल,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील राज्य क्रीडा (कुस्ती) मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांचेशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.