बुलडाणा, दि.25 : जिल्ह्यात ई श्रम पोर्टलद्वारे नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1 लक्ष 66 हजार 158 एवढ्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ठिक ठिकाणी शिबिरे घेण्यात येत आहेत. विट भट्टी, खाणी अशा ठिकाणी पोहचून कामगारांची नोंदणी करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी पुढाकार घेवून नोंदणी करून घ्यावी. ई श्रम पोर्टलवर जिल्ह्याकरीता 10 लक्ष 226 एवढे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. विट भट्टी व इतर व्यवसायांच्या मालकांनीही आपल्या कामगारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे. असंघटीत बांधवांनी नोंदणी करून घेवून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत कामगारांसाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती,बुलडाणा यांच्यासमवेत झालेल्या ई श्रम पोर्टल व असंघटीत कामगारांसाठीच्या योजनांबाबत 24 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड आदी उपस्थित होते. योजनेमध्ये नोंदणी विनामूल्य असून असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक अंशदान केंद्रशासन भरणार आहे. या योजनेत बांधकाम कामगार, विटभट्टी कामगार, शेतमजूर, फेरीवाले फळ-भाजी विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, असंघटीत क्षेत्रातील व सुमारे 300 उद्योग व व्यवसाय येतात. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सद्यस्थिती केंद्र शासनामार्फत ई-श्रम कार्ड योजना राबविण्यात येत आहे. योजनेत नोंदणी करण्याकरीता असंघटीत कामगारांचे वय 16 ते 59 वर्ष असावे. तो प्राप्ती कर भरणारा नसावा, ईपीएफ व ईएसआयसी चा सदस्य नसावा.
असंघटीत कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला दोन लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याचप्रमाणे अपघातात पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रूपये व अंशत: अपंगत्व आल्यास 1 लाख रूपयांची तरतूद या विमा योजनेत आहे. त्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, वारसदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणी ऑनलाईन ई-श्रम पोर्टलवर स्वत: नोंदणी करता येते. किंवा सीएससी केंद्रावर जावून अथवा www.eshram.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येते, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी श्री. राठोड यांनी दिली आहे.











