महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी दि.२३ जानेवारी रोजी तालुक्यात दोन ठिकाणी कोंबडबाजारावर टाकलेल्या धाडीत १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १० आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिरादेवी आणि मांगली येथील शिवारात काही इसम कोंबडबाजार भरवून त्यावर जुगार खेळत असल्याची खात्रशीर गुप्त माहिती खब-याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पंचासह मौजा चिरादेवी गावालगत असलेल्या झुडपी जंगल परिसरात धाड टाकली असता तेथे ७ इसम कोंबडबाजार भरवून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोंबडबाजारासाठी लागणारे साहित्य, कोंबडे व वाहने असा एकूण १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मौजा मांगली येथील झुडपी जंगल परिसरात धाड टाकली असता तेथे ३ इसम कोंबडबाजार भरवून जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोंबडबाजाराचे साहित्य, कोंबडे आणि वाहने असा एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सर्व आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. ही कारवाई अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोपाल भारती, उपनिरीक्षक गजानन तेलरांधे, पोलिस शिपाई शशांक बदामवार, जगदिश झाडे, निकेश ढेंगे, अजय झाडे, रोहीत चिटगिरे, विश्वनाथ चुदरी यांनी केली.