वाशिम : गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवा प्रकार राज्यात आढळून आला आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हयात सुध्दा गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने रुग्ण्ा संख्येत देखील वाढ होत आहे. जिल्हयात सुध्दा गुरांचे बाजार व आठवडी बाजारात नागरीक मोठया प्रमाणात एकत्र येत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आठवडी व गुरांचे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीच्या उपायोयजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 9 जानेवारी 2022 रोजीच्या आदेशानुसार सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने जिल्हयातील गुरांचे बाजार व आठवडी बाजारामध्ये मोठया प्रमाणात नागरीक एकत्र येत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार वाशिम शहरातील व जिल्हयातील सर्व आठवडी बाजार व गुरांचे बाजार 10 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत हे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात येईल.