अकोला – जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, कापूस, तूर, कापूस व कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर सातरगाव ता. बाळापुर येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून बाळापूर तालुक्यातच २१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला तालुक्यात १२ हजार ५४५ हेक्टर, बार्शी टाकळी तालुक्यात १०७४ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ९५७१ हेक्टर, पातुर तालुक्यात १६० हेक्टर, मुर्तिजापूर तालुक्यात २६०० हेक्टर असे एकूण २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कांदा तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच बाळापूर तालुक्यात सातरगाव येथे रविंद्रसिंह चतुरसिंह चव्हाण(वय २७) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला तर बटवाडी येथे सात बकऱ्या व १५ मेंढ्या वीज पडून दगावली आहेत,असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.