सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग : अनसिंग येथील श्री पदमप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने केंद्र सरकारने मुलींच्या विवाहाच्या संदर्भात एकवीस वर्षे वय याबाबत आणलेल्या विधेयकाच्या संदर्भाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अनिल जैन हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ, सचिदानंद बिचेवार यांनी या विषयावर चर्चासत्र आयोजनामागील पार्श्वभूमी विशद केली. मध्ययुगापासून मुलींच्या विवाहाचे वय कमी कमी होत जाऊन बालविवाहाची कुप्रथा कशी समाजात रूढ झाली. त्यातून बाहेर पडण्यासाठी समाजसुधारकांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले, याचा संपूर्ण इतिहास मांडला.

याच विषयावर महाविद्यालयातील बीए भाग 3 चे विद्यार्थी ऋषिकेश जोगदंड,आकाश घटमाल, गणेश चिखलकर, कु.प्रतीक्षा सातव आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. गजानन बनचरे, डॉ.विनोद राठोड यांनीही प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने विवाहाचे वय 21 वर्ष करणे समाज व राष्ट्र हिताचे असून महिलांच्या स्वातंत्र्याचा यामुळे सन्मान होईल, त्या स्वामीमानी, स्वावलंबी बनून समानतेने आपले स्थान निर्माण करू शकतील. सोबतच लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीनेही याचा देशाला फायदा होईल असे मत व्यक्त केले. डॉ.अनिल जैन यांनी पाश्चात्य व आधुनिक विचार प्रवाहाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे, महिलांच्या विशेषतः मुलींच्या सन्मानाच्या दृष्टीने आधुनिकतेचापण सन्मान केला पाहिजे असे विवाहाचे एकवीस वर्षे वय याचे समर्थन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत मुलींना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जर शासनाने प्रयत्न केले तर विवाहाचे एकवीस वर्षे वय उचित राहील अन्यथा सामान्य लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना जबाबदार मुलीला सांभाळणे अवघड जाईल असे मत व्यक्त करून या नवीन येणाऱ्या महत्त्वाच्या विषयाचे समर्थन प्राचार्य डॉ. गुल्हाने यांनी केले. यावेळी बीए भाग 1 2 3 चे विद्यार्थी उपस्थित होते.










