अकोला, दि.२७ – प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांनी शेतीपूरक पशु पालन, पशु व्यवस्थापन , औषधोपचार, चारापिके, मूल्यवर्धित उत्पादने आणि विपणन यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, यांनी केले. राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने संस्थेचे दत्तक ग्राम मोरगाव भाकरे येथे आयोजित कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सौ. शुभांगीताई भटकर, अधीक्षक डॉ. सुनील वाघमारे हे उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तक ग्राम समन्वयक डॉ. मंगेश वडे यांनी केले. डॉ. कुलदीप देशपांडे यांनी ‘समतोल चारापिकांचे व्यवस्थापन’, तर डॉ. गिरीश पंचभाई यांनी ‘उत्पादन वाढीसाठी पशुपोषणाचे नियोजन’ याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.दिघे यांनी प्रातिनिधीक स्वरुपात वामनराव भाकरे, गणेश कवर, रामदास वाडेकर, सुरेश वाघ आणि राम माठे या शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले. दत्तक ग्राम समन्वयक डॉ. वडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.