महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.पूर्वी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टीराहतअसे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून ६४व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात आले आहे. चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येंनी पत्रे येत आहेत, आणि ही पत्रे उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे.











