महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : ज्या मंदिरांमध्ये नित्य सामुदायिक उपासना होते, अशी उपासना केंद्रे असलेली मंदिरे ही संस्कार केंद्रे आहेत.असे प्रतिपादन परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांनी भद्रावती येथील श्री गणेश दत्त गुरु पंचायतन मंदिरातील उपासना केंद्रात केले.
ते पुढे म्हणाले की, आज भ्रमणध्वनी, दूरदर्शन व वाईट संगतीमुळे माणसं एकमेकापासून दूर गेली आहेत. मनुष्य स्वतः स्वार्था पलीकडे आपल्या शेजारच्या माणसाकडे बघायला तयार नाही. आपले नातेवाईक, मित्र हे त्याला नकोसे वाटतात. तो निराश, हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत उपासना हा एकच संस्कार असा आहे, ज्यामुळे जातीभेद, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब हा भेद होत नाही. उपासनेतून संस्कारित झालेले उपासक जेव्हा कार्य करतात, तेव्हा त्यांचे कुटुंब, समाज व हे राष्ट्र सशक्त,सदाचारी व बलवान होण्यास मदत होते. त्यामुळे अशी उपासना केंद्रे जागोजागी निर्माण व्हावीत व त्यातून एक राष्ट्रशक्ती निर्माण व्हावी अशी इच्छाही प.पू.श्री.सद्गुरुदास महाराज यांनी व्यक्त केली. सकाळी ११ वाजता महाराजांचे आगमन भद्रावतीला झाले. प्रथम उपासना झाली. त्यानंतर शंका समाधानाचा कार्यक्रम झाला. समारोपीय कार्यक्रमात गडचिरोली केंद्रातून आलेल्या सौ. सुरेष्णा रोटकर यांनीही आपले विचार मांडलेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रितेश ठक्कर यांनी केले. कार्यक्रमाला भद्रावती, चंद्रपूर, वणी, नागपूर येथील उपासक व नागरिक उपस्थित होते.











