किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
काही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
पातूर तहसील कार्यालयाच्या बेजबाबदार व गलथान कारभारामुळे काही शेतकरी दिवाळी पुर्वी मिळणा-या शासनाच्या नुकसान भरपाई पासून वंचित – ठाकूर शिवकुमारसिंह बायस
पातुर – येथिल काही शेतकरी आपल्या रक्ताचं पाणी करून कष्टाने घाम गाळून दिवसरात्र एक करून मेहनतीच्या जोरावर शेतात राब राब राबतो व समाजासाठी निरनिराळ्या प्रकारचे पिक घेतो.
तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात सोन्यासारखे पिक उगवले व काढणीला आले असतांना मानव निर्मित निसर्गाच्या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे अतोनात नुकसान होऊन प्रत्येक शेतकरी हवालदिल झाला.
शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या पडलेल्या वक्र दृष्टी ने हिरावून घेतला व शेतकरी राजावर उपासमारीची वेळ आली.शेतकरी वर्गाला आत्महत्या करण्याच्या पलीकडे काही सुचत नव्हते अशावेळी त्या त्या भागातील समाजसेवी संस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे उंबरठे झिजवून त्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत मालाच्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर होईल तेवढी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी आंदोलन केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने त्याची दखल घेवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर त्यांच्या बँक खात्यात हेक्टरी दहा हजार रूपये टाकण्याचे जाहीर केले व तसा निधी तात्काळ उपलब्ध ही केला.पातुर तालुक्यातील पातुर तहसील अंतर्गत येणा-या ब-याच शेतकरी बांधवांच्या बॅंक खात्यात हेक्टरी दहा हजार रूपये प्रमाणे ती रक्कम जमा ही झाली परंतु काही कष्टकरी शेतकरी वर्गाच्या खात्यात एक रूपया ही जमा आतापर्यंत जमा झाला नाही त्यामुळे त्यांची दिवाळी प्रकाशमान न होता अंधकारमय झाली आहे.
काहींनी थेट पातुर तहसील
कार्यालयात जाऊन याविषयी विचारणा केली असता तेथील उद्दामपणा अंगिकारलेले अरेरावीची भाषा करणारे तलाठी यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देवून परत पाठवले.अशा शेतकऱ्यांनी पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांना याबाबत माहिती दिली व मदत करण्यास विनंती केली.त्यांनी ही क्षणाचा विलंब न लावता या संबंधीत तहसील कार्यालयात कार्यरत असणारे जामोदकार तलाठी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला व यासंबंधीची माहिती द्यायला विनंती केली.त्यावर त्यांनी उडवाउडवीची न पटणारी माहिती दिली.त्यावर त्यांनी तहसीलदार दिपक बाजड यांना शेतक-यां विषयी घडलेला प्रकार सांगितला त्यांनी चौकशी करून लवकरात लवकर दिवाळी नंतर बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात नुकसान भरपाई चे पैसे टाकण्याचे त्यांना आश्वासन दिले.
दिवाळी संपून आठवडा झाला पण आजुन ती रक्कम शेतक-यांना मिळाली नसल्याने पातुर तालुका विकास मंचाने या विषयी नायब तहसिलदार एहसानोद्दीन यांना याबाबत सांगितले असता त्यांनी यासंदर्भात आलेला चौदा कोटींचा निधी संपला आहे व पुढील निधी मंजूर झाल्यानंतर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तो वितरित केला जाईल असे सांगितले.
यावरून पातुर तहसील कार्यालयाचा ढिसाळ व बेजबाबदार कारभार उघडकीस आला आहे.असे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी यावेळी सांगितले तसेच पुढील आठ दिवसांत नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा न झाल्यास या शेतकरी बांधवां सोबत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून संबंधित तलाठ्याचे तात्काळ निलंबन करा यास्वरूपाची मागणी करणार असल्याचे कळते आहे.मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयाला कुलूप लावू असा इशारा दिला आहे.
यावर प्रशासन काय निर्णय घेते हे बघने उत्सुकतेचे ठरेल.











